वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा–मूठ येथे श्री केपादेवीचे प्रसिध्द मंदिर आहे. या मंदिराच्या पुनर्बाधणीचे काम सध्या सुरु आहे. सुमारे चारशे वर्षापुर्वीचे हे देवस्थान असल्याचे सांगितले जाते. श्री केपादेवी ही गिरप घराण्याची कुलदेवता व उभादांडा गावची ग्रामदेवता म्हणून प्रसिध्द आहे.
देवीचे स्वरुप म्हैसासुरमर्दिनी असे आहे. चार हात असून एका हातात तलवार, दुसर्या हातात ढाल, तिसर्या हातात त्रिशूल ही शस्त्रे असून चौथ्या हातात म्हैसासूराचे मुंढके आहे. मंदिराचे पहिले बांधकाम सावंतवाडी संस्थानच्या पहिल्या राजाने केले. त्याच्या व्यवस्थापनासाठी परिसरातील जमिनीही दान दिली. आणि गिरप घराण्याकडे त्याची जबाबदारी सोपवली. गावातील सर्व कुळाचार या मंदिरात करण्याच्या रुढी आहेत. मंदिरातील सर्व विधी करण्याची जबाबदारी गिरप घराण्याकडे असून त्यामध्ये चार बक्कलदार आहेत. त्या व्यतिरिक़्त गावचे सात वाडेकरी असून हे सर्व मानकरी उपस्थित झाल्यावरच प्रत्येक उत्सवास सुरुवात होते. नवरात्रोत्सव उत्सव, तुलसी विवाह, कार्तिक पाडवा, जत्रोत्सव, समधारणा, शिमगा, चैत्रपाडवा असे उत्सव मोठ्या आनंदात येथे साजरे केले जातात. या पुरातन मंदिरात जीर्णोध्दार सन १९६६ साली पुर्ण झाला. मात्र २००८ मध्ये एक दुर्घटना घडल्याने मंदिराची पुनर्बांधणी पुन्हा केली जात आहे.

