श्री देव मानसीश्वर वेंगुर्लेवासीयांचे अढळ श्रध्दास्थान असलेले हे देवस्थान खाडीकिनारी वसले आहे. या देवस्थानाच्या वार्षिक जत्रोत्सवाला ‘शिडाची जत्रा व बत्तीची जत्रा’ या नावाने संबोधले जाते. या देवासाठी खासकरुन चुरमुर्याचे लाडु, शेंगदाणे लाडु, केळी, नारळ, भगवी निशाण, पेट्रोमॅक्सबत्या, घंटी अशा स्वरुपाचे नवस भाविक लोक श्रध्देने करतात. जत्रोत्सवादिवशी सुमारे ५ ते ६ हजार भगव्या निशाणीच्या पताका या देवस्थानाला भाविक लोक घालतात.
निसर्गरम्य वातावरणातील व समुद्राच्या पाण्यानजीक असलेल्या या देवतेच्या नजीकच्या पुलावरुन सोमवती तसेच अमावस्येच्या महोदय पर्वणी तीर्थस्नानात तालुक्याबरोबरच अन्य तालुक्यातील देवदेवता, तरंग देवता व रयत सागरेश्वर किनारी जातात. अशा एका पहिल्याच अभ्यंगस्नानाच्या महोदय पर्वणीस जाताना मानसी पुलावर हया देवतेने आपले अक्राळविक्राळ स्वरुप प्रगट करुन तो पाय पसरुन उभा राहीला. आपल्या पायाखालुन सर्वानी जावे असा त्याचा आग्रह होता. हा आग्रह सशर्तपणे सर्वच देवतानी पाळला. मात्र वेंगुर्लेचे ग्रामदेवतेस तो अपमान वाटला. त्याने मानसीश्वरास तु पाय बाजुला कर मी स्नानास जावुन येतो व येताना तुझ्यासाठी अदभुतरम्य असा दहा पायचा अश्व (घोडा) भेट देतो, असे सांगताच मानसीश्वराने एक पाय बाजुला घेताच वेंगुर्लेचे ग्रामदैवत सागरेश्वर किनारी स्नानास गेले. आपल्याला हया ग्रामदैवतेकडुन असे अदभुत काहीतरी मिळणार यामुळे मानसीश्वर खुशीत होता. पुनश्च सर्व देव स्नान करुन परत आले त्या बरोबर वेंगुर्लेचे ग्रामदैवतही आले. आता आपल्याला ते अदभुत आगळवेगळ वाहन मिळणार. आता ते सुध्दा दहा पायाचे त्या खुशीत मानसीश्वराने परत जाणार्या वेंगुर्लेच्या ग्रामदैवतेस जातेवेळी केलेल्या आश्वासनाची आठ्वण करुन दिली. त्यावेळी समुद्रकिनार्यावरुन आणलेली एक कुर्ली (खेकडा) मानसीश्वरास देवुन हा घे तुझा वारु (घोडा) असे म्हणत दहा पायांची कुर्ली दिली. त्यावेळी मानसीश्वर भडकला. मला फसवलेस काय, आता या पुढे येथुन जावु देणार नाही. जायचच असेल तर माझ्या पायाखालुन जा असे सांगितले. तेव्हा पासुन आज पर्यत वेंगुर्लेचे ग्रामदैवत फक़्त परबवाडामार्गे सागरेश्वर किनारी समुद्र स्नानास जाते. मात्र बाकी सर्व गावच्या देव देवता या मानसीपुलावरुन वाद्ये न वाजवता जातात.
श्री देव मानसीश्वराचे देवस्थान हे सिंधुदुर्गातील एक महत्वपूर्ण पर्यट्नस्थळ आहे. समुद्राच्या पाण्याचा वावर देवस्थानच्या सभोवती असतो. हे खास आकर्षण आहे. शांतता, नैसर्गीक सानिध्य असलेल्या ह्या देवस्थानात पर्यट्कही काही काळ विश्रांती घेतात. देवाची काही भाविक मंडळी या देवास जीवंत खेकडे नवस म्हणुन प्रदान करतात.

