रमणीय सागरेश्वर सागरीकिनारा

सागरेश्वर किनारी दाट सुरुची बनं
पाहुनी प्रसन्न होतील तुमची मनं
समुद्राचा खारा वारा
दिवसभराचा क्षीण जाईल सारा

स्वच्छ व  सुंदर सागरी किनार्‍या बरोबरच पांढरी शुभ्र वाळू हे या किनारपट्टीचे वैशिष्ट्य आहे. महासागराची अथांगता, भव्यता डोळे भरुन पाहावयाची असेल, मनात साठवायची असेल, तर त्यासाठी ‘सागरेश्वराला’ यावे लागेल! वेंगुर्ला शहराच्या जवळ असलेले हे ठिकाण पर्यटकांच्या पसंतीला निश्चितच उतरणार आहे. मुख्य रस्त्यापासून पश्चिमेकडे सागरेश्वर मंदिराच्या दिशेने काही अंतर जावे लागते. त्यानंतर समोर दिसते ती पांढर्‍या शुभ्र सागरी रेतीची अवाढव्य भिंत. ती ओलांडत पुढे थोडे अंतर वाळूत रुतणारे पाय सावरत चालत असतानाच अचानक समोर निळाशार अथांग दर्या दिसू लागतो.दृ सागरतिरी पोहोचल्यानंतर दिसणार्‍या दृष्याचा अपूर्वाईने कोणीही रसिक क्षणभर थक़्क़ झाल्याखेरीज राहणार नाही. दूरवर सागरात घुसलेल्या टेकडीवरील वेंगुर्ला विश्रामगृहाचे व वेंगुर्ला बंदराचे विहंगम दृष्य, दक्षिणेकडे दूर-दूर दिसणारा मोचेमाड कातळवजा डोंगर, त्याच्या पायथ्यावर येवून आदळणार्‍या लाटांनी उंचपर्यंत उडणार्‍या धवलतुषारांची आतषबाजी ही सारी सारी दृष्ये समोर येतात.

सागरेश्वराच्या वाळूत तासनतास बसावे, सागराचे निरीक्षण करत रहावे, वाळूत खेळावे, किल्ले बांधावेत, भरतीच्या वेळात किनार्‍यास येवून भिडताना तयार होणार्‍या अर्ध गोलाकार नागफणीच्या  आकाराच्या सागरी लाटांच्या भिंती व हा हा म्हणता जाणवणारा त्यांचा क्षणभंगुरपणा न्याहाळणे हा देखील कोणाचा आवडता छंद असू शकतो. सागरेश्वराचा किनारा पोहण्यासाठीसुध्दा योग्य असा आहे. किनार्‍यालगत बरीच उथळता असल्याने समुद्रस्नानाचा आनंद मनमुराद लुटता येतो.  रुपेरी वाळूच्या स्वच्छ व सुंदर किनार्‍यावर बागडण्याबरोबर क्रिकेटसारखे खेळही खेळता येतात. पौर्णिमेच्या रात्री येथील किनार्‍याची शोभा काही और असते. या किनार्‍यावर वाळू विपूल प्रमाणात व विविध भौगोलिक स्वरुपात उपलब्ध असल्याने ‘सँड स्कैटिंग’ सारखे खेळ येथे सुरु करता येणे शक्य़ आहे. पर्यटन विकास महामंडळातर्फे या ठिकाणी तंबू निवासाची सुविधा उपलब्ध केली आहे.

Scroll to Top